Ambernath : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर एका महिलेची तिच्याच प्रियकराने धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, हा खून प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याचे समोर आले आहे.
सहा वर्षांचे प्रेमसंबंध आणि पैशाचा वाद
३५ वर्षीय सीमा कांबळे आणि २९ वर्षीय राहुल भिंगारकर यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सीमाने राहुलला जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी दिले होते, मात्र त्यानंतर ती त्याच्याकडून पैसे मागत होती. सीमाने राहुलला “पैसे परत दे किंवा लग्न कर” असा तगादा लावल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले.
आरोपीच्या विकृत हेतूचा उलगडा
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. राहुल सीमाच्या घरी वारंवार येत असे, मात्र त्याचा डोळा सीमाच्या १३ वर्षांच्या मुलीवर होता. राहुलच्या आईला सीमासोबतच्या लग्नाचा विरोध होता आणि तिनेही सीमाला धमक्या दिल्या होत्या. “राहुल तुझ्याशी नाही, तर तुझ्या मुलीशी लग्न करेल,” असे धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रिजवर खून : विश्वासघाताचा शेवट
रविवारी राहुलने सीमाला फोन करून “तुझे पैसे देतो, भेटूया” असे सांगितले. विश्वास ठेवून सीमा अंबरनाथ रेल्वे स्थानकावर पोहोचली. दोघे चालत पुलाच्या दिशेने गेले, मात्र त्यावेळी सीमाने आपल्या बहिणीला फोन करून “राहुल मला संपवणार आहे” असे सांगितले. तरीही तिने त्याच्यावर विश्वास ठेवला.
पुलाच्या पायऱ्या चढताना दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. अचानक राहुलने धारदार शस्त्र काढून भरदिवसा तिच्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत सीमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिस तपास आणि आरोपीला अटक
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राहुलला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंध, आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद हेतू या तिन्ही कारणांमुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.