Airtel gallery : मुंबईतील चारकोप येथील एअरटेल गॅलरीत एका कर्मचाऱ्याने ग्राहकाशी मराठीत संवाद साधण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. “मराठी बोलण्याची गरज नाही,” अशा शब्दांत संबंधित महिला कर्मचाऱ्याने उद्दाम भाषा वापरल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठीत संवादाचा आग्रह धरणाऱ्याला विरोध
तक्रार करण्यासाठी आलेल्या *मराठी ग्राहकाने स्थानिक भाषेत बोलण्याचा आग्रह धरला. मात्र, त्या कर्मचाऱ्याने *“क्यों मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है? हम हिंदुस्तान में रहते हैं”* असे म्हणत मराठीत बोलण्यास टाळाटाळ केली. हा संवाद व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येत असून, अनेक *मराठी भाषिक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा, अखिल चित्रे यांचा इशारा
घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी थेट एअरटेलच्या गॅलरीत भेट देत प्रशासनाला जाब विचारला. “महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत. जर मराठीत सेवा देऊ शकत नसाल, तर मुंबईतील एअरटेल गॅलरी दिसणार नाहीत,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
तसेच, “इतर भाषांचा आम्हाला विरोध नाही, पण महाराष्ट्रात किमान ८०% कर्मचारी मराठी भाषिक असावेत,” अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, एअरटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर #SpeakMarathi आणि #BoycottAirtel असे ट्रेंड दिसू लागले आहेत. अनेकांनी महाराष्ट्रात मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
एअरटेलकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित
या प्रकरणावर एअरटेल प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.