Virat Kohli : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीतीत आली. अवघ्या दीड दिवसांमध्ये 33 विकेट्स पडलेल्या या सामन्यात खेळपट्टीच्या लहरीपणामुळे अनेक विक्रम मोडले गेले.
या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. त्यापैकी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर चेंडू लागण्याची घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांवर बाद झाला.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर खेळताना डेव्हिड बेडिंगहॅमच्या बॅटची कड घेऊन चेंडू विराटच्या अगदी समोर पडला. विराटने हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चेंडू दोन्ही स्लीपच्यामधील गॅपमधून जात असताना विराटच्या हाताजवळ पडला. विराट हा चेंडू पकडणार असं वाटत होतं. मात्र अचानक चेंडू अनपेक्षितपणे बाऊन्स झाल्याने विराट गोंधळला.
चेंडू विराटच्या हाताला लागून चेहऱ्यावर लागला. विराटने पटकनं आपला चेहरा मागे घेतला. हा चेंडू जोरात लागला असता तर विराट नक्कीच गंभीर जखमी झाला असता. विराट कोहली हा भारतीय संघाच्या फलंदाजीमधील फार महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे विराट अगदी थोडक्यात या चेंडूपासून आणि मोठ्या दुखापतीपासून बचावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
या सामन्यात खेळपट्टीचा लहरीपणा सर्वात चर्चेचा विषय ठरला. अनेकदा असं दिसून आलं की, अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेत होता. तर कधी उसळीच घेत नव्हता. याच लहरीपणावर अगदी समालोचकांपासून ते माजी क्रिकेटपटू आणि सामन्यानंतर थेट भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही टोला लगावला आहे.
केवळ 642 चेंडूंमध्ये दुसरा सामना संपला. या सामन्यामध्ये 4 डावांमध्ये एकूण 464 धावा दोन्ही संघांनी मिळून केल्या. मात्र कसोटी सामने अशापद्धतीने संपत असतील तर ही भविष्यात कसोटी सामन्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.