मविआत जागांची आदलाबदल? केंद्रातलं मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा त्याग करणार, जाणून घ्या…

सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. तसेच ठाकरेंनी काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या. यामुळे यावर काँग्रेस नेते नाराज झाले. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

असे असताना आता हा विषय हायकमांडकडे गेल्याने आता काँग्रेस आणि ठाकरेसेनेत मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये आता मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

याठिकाणी ठाकरेंनी अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर केली आहे. देसाई राज्यसभेचे खासदार आहेत. पक्षफुटीनंतरही सोबत राहिलेल्या देसाईंना जनतेतून निवडून आणण्यासाठी ठाकरेंनी त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. मात्र आता पेच निर्माण झाला आहे.

ही जागा काँग्रेसला सोडून त्याबदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर मुंबईची जागा दिली जाऊ शकते. यासाठी वर्षा गायकवाड दिल्लीत गेल्या असल्याची माहिती आहे. त्यांनी याबाबत पक्ष नेतृत्वाशी बोलणी केल्याची माहिती आहे. इथून ठाकरेसेनेकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

विनोद घोसाळकर हे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. दरम्यान, अनिल देसाईंना मोदी सरकार १ मध्ये मंत्रिपद मिळणार होतं. त्यासाठी ते नोव्हेंबर २०१४ मध्ये दिल्लीला गेले होते. मात्र अचानक सगळं गणित फिस्कटल. ते विमानतळावरुन मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पोहोचणार होते.

असे असताना राज्यात सत्तेवरून पेच निर्माण झाला. यामुळे शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली. शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी निघालेल्या देसाईंना ठाकरेंनी माघारी बोलावले. त्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. यामुळे आता देखील त्यांना लोकसभेला त्याग करावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.