अजित पवार यांनी बंड करत भाजप शिवसेनेसोबत हात मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फूट पडली असून एक शरद पवारांचा गट तर दुसरा अजित पवारांचा गट असे दोन गट तयार झाले आहे. अशात पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्व पक्ष आता पासूनच कामाला लागले आहे. अशातच अजित पवार गटाकडून पवार कुटुंबातील एका सदस्याची राजकारणात एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या बॅनरवर फोटो दिसून आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
गेल्यावर्षी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा प्रभाव केला होता. शिवसेना त्यावेळी भाजपसोबत युतीमध्ये होती.
लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच पार्थ पवारांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. आता पुन्हा एकदा असेच काहीसे घडताना दिसत आहे. अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे राजकारणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते अजित पवारांचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहे. अशात एका बॅनरवर जय पवार यांचा फोटो असल्यामुळे राजकारणात ते येणार असल्याची चर्चा होत आहे.
मुंबई सचिव गणेश आडविरेकर यांनी अजित पवारांना शुभेच्छा देणारा एक बॅनर लावला आहे. त्या बॅनरवर जय पवार यांचा फोटो आहे. त्यामुळे येत्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणूकीत ते लढणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.