आणखी एका राजकीय कुटूंबात फाटाफूट! बाप शरद पवारांसोबत तर मुलगा अजितदादा गटात

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच काही आमदारही अजित पवार गटात जाताना दिसत आहे.

नेते, पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात जात असल्यामुळे शरद पवारांना मोठे धक्के बसत आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा पक्षबांधणीला लागले आहे. असे असतानाच आता सोलापूरमध्ये शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

शरद पवार यांचे समर्थक बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे अजित पवारांच्या गटात सामील झाले आहे. जितेंद्र साठे हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच संचालक आहेत. त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांच्या मध्यस्थीनेच जितेंद्र साठे यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता जितेंद्र साठे यांच्या पाठोपाठ आणखी काही पदाधिकारीही अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राज्यभरातील जिल्ह्याजिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. बळीराम साठे यांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. त्यांच्यात आणि मुलगा जितेंद्र साठे यांच्या फाटाफुट झाल्याचे मंगळवारी समोर आले होते.

जितेंद्र साठे हे भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती. पण त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. जितेंद्र साठे यांचे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये चांगले वर्चस्व आहे. त्याचा फायदा आता अजित पवारांना होणार आहे.