भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आर्थिक आणि वैयक्तिक अडचणीत असून, त्यांची अवस्था कोणालाही हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या या स्थितीने भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव व्यथित झाले आहेत. कपिल देव यांनी कांबळीला वैद्यकीय मदत आणि आर्थिक पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे.
कपिल देव यांनी स्पष्ट केले की, “विनोदचा सर्व खर्च मी उचलायला तयार आहे, पण त्याने प्रथम स्वत:हून पुनर्वसनासाठी (रिहॅब) जायला हवे.” कपिल देव यांचे हे विधान कांबळीच्या भल्यासाठी असून, पुनर्वसन प्रक्रियेनंतर त्यांच्यावर होणाऱ्या कोणत्याही उपचाराचा खर्च ते उचलणार आहेत.
रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारक कार्यक्रमात बलविंदर संधू उपस्थित होते. यावेळी कपिल देव यांनी बलविंदर संधूंशी संवाद साधत विनोद कांबळीला मदत करण्याची तयारी दर्शवली. बलविंदर संधू म्हणाले, “कपिल यांनी विनोदच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना फक्त हवी ती गोष्ट म्हणजे विनोदने रिहॅबसाठी स्वत:हून पाऊल उचलावे.”
आचरेकर सरांच्या स्मारक कार्यक्रमात विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरसोबत संवाद साधला, त्यानंतरचा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतरही विनोदच्या स्थितीबद्दल चर्चा झाली, सहानुभूती व्यक्त करण्यात आली, पण कोणीही प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे आले नव्हते.
कपिल देव यांनी मात्र हा पुढाकार घेतला असून, विनोदला सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी दाखवली आहे. याआधीही कपिल देव यांनी कर्करोगाशी झुंजणाऱ्या अंशुमन गायकवाड यांना मदत केली होती.
आता सर्वांचे लक्ष विनोद कांबळीच्या प्रतिसादाकडे लागले आहे. यापूर्वीही त्याला उपचारांसाठी पाठिंबा देण्यात आला होता, मात्र त्यावेळी कांबळीने योग्य प्रतिसाद दिला नव्हता. या वेळी कपिल देव यांची मदत स्वीकारून विनोद पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कपिल देव यांच्या या पुढाकारामुळे एकेकाळचा दमदार क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा आयुष्यात स्थिर होऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे.