मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा आवडता कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेचे नाव सर्वात पुढे येते. आजही त्याचे चित्रपट अनेकांच्या मनात घर करून बसले आहेत. मराठीसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याचे आजही लाखो चाहते आहेत.
या अभिनेत्याचे 16 डिसेंबर 2004 मध्ये निधन झाले. पण त्यांचा शेवट नेमका कसा झाला याविषयी त्यांचा भाऊ आणि निर्माते, लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले आहे. एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांचे बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांनी भावाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. त्या काळात लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या चुलतभावाबरोबर नाटकांमध्ये काम केलं
पुरुषोत्तम म्हणाले, ‘लक्ष्मीकांतला मी लहानपणापासून ओळखतो. तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. कोणाच्या हाताखाली राहायचं हा त्याचा प्रांतच नव्हता. लक्ष्मीकांतला मी कधीच सांगू शकलो नाही की तू ह्या ह्या गोष्टींपासून लांब राहा.
त्याला सुपरस्टार पद मिळालं आणि त्याने ज्या पद्धतीने त्याचं लाइफस्टाइल बदललं त्या गोष्टीपासून त्याला लांब जाण्यासाठी अध्यात्माची गरज होती. मात्र त्याला ते कसं सांगावं हे मला कळत नव्हतं. या क्षेत्रात तुम्हाला अध्यात्म अत्यंत महत्वाचं आहे. अहंकारावर ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला हा मार्ग निवडायला पाहिजे.
त्याने त्याच्या बायकोचं प्रियाचं सुद्धा ऐकलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यावर बोलताना पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले, लक्ष्याने स्वत:ला संपवलं. ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने ते केलं नाही.
शरीर हे तुमचं फार महत्त्वाचं माध्यम असतं, जर तेच नसेल तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार. त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल, तेव्हा तुमचं सगळं संपतं, हेच नेमकं लक्ष्याच्या बाबतीत झालं, असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.