धनुष्यबाण नाही तर ‘या’ चिन्हावर लढणार निवडणूक, शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर कारवाई झाली तर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपात्रतेची कारवाई झाली तर ते भाजपमध्ये जातील असेही म्हटले जात आहे. याबाबत शिंदेंच्या आमदारांनाही प्रश्न विचारण्यात येत आहे.

असे असताना जळगाव पाचोऱ्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या कमळ चिन्हावरही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य असेल असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.

किशोर पाटील यांच्या विधनामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरले तर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील असे संकेतही किशोरी पाटील यांनी यावेळी दिले आहे.

अपात्रतेची कारवाई झाली तर एकनाथ शिंदे जे सांगतील ते आम्ही करु. ते म्हणाले अपक्ष निवडणूक लढवा तर तशी निवडणूक लढवू. ते बोलले भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवा तर आम्ही तसेही करु. इतकंच नाही तर त्यांनी आम्हाला घरी बसायला सांगितलं तर आम्ही घरी पण बसू असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे आमच्या नेते आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या सुचनांचे पालन आम्ही करु. अपात्रतेबाबतची कारवाई ही न्यायालयीन बाब आहे. मी काय त्यातला तज्ञ नाही. पण आमच्यावर कारवाई होणार नाही असे मला वाटते, असेही किशोर पाटील यांनी म्हटले आहे.

अपात्रतेची कारवाई झाली आणि आम्ही भाजपमध्ये गेलो तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच राहतील. आम्हीच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जाहीरपणे सांगत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये कुठलाही बदल होणार नाही, असेही किशोर पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच किशोर पाटील यांनी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, त्यांची चर्चा करुन राजकारणात अस्वस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे आहे. त्यांचं कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे ते कधीही भेटू शकतात. पण माध्यमांनी वेगळ्या पद्धतीने त्या बातम्या केल्या आहेत.