Kunbi Certificate : कुणबी दाखल्यासाठी जादा पैसे मागितल्यास होणार कारवाई, प्रशासन झाले खडबडून जागे…

Kunbi Certificate : सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. असे असताना हे प्रमाणपत्र काढत असताना राज्यात काही ठिकाणी जास्तीच्या पैशांची मागणी केली जात आहे. यामुळे यावर कारवाई केली जाणार आहे.

अनेक ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची याकरिता मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत. परंतु काही सेतू चालकांकडून कुणबी प्रकरण दाखल करून घेण्यासाठी अडवणूक केली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

कुणबी प्रमाणपत्र करिता काही सेतू चालक ५० रुपये फी घेण्याऐवजी हजारो रुपयांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अशा प्रकारे कोणी मागणी करत असेल तर कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

याबाबत श्रीरामपूर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधींनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी सुरेश कांगुणे म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता महसूल विभागाने अनेक ठिकाणी शिबिरे आयोजित करून कागदपत्रे घेतलेली आहेत.

त्यामधील काही बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. असे असताना काहीजण जास्तीचे पैसे मागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तशा तक्रारी देखील पुढे आल्या आहेत. याबाबत तहसीलदार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यात लाखोंच्या नोंदी आढळून आल्याने त्यांना दाखले दिले जात आहेत. मात्र अनेक ठिकाणी यामध्ये अडचणी देखील येत आहेत. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषण करण्यासाठी बसले आहेत.