Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
त्याला अटक झाल्यानंतर मुंबईत आणण्यात आले. यावेळी बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये आता काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असून त्यानंतर ललित पाटील याला अंधेरी न्यायालयात हजर केले जाईल. ललित पाटील नेमका आहे तरी कोण, हे पाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी झाली होती.
पोलीस ललित याला रुग्णालयात नेत असताना तो पहिल्यांदाच सगळ्यांना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर पोलिसांनी काळ्या रंगाचा कपडा घातला होता. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने राज्यभरात या गुन्ह्याच्या तपासाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये बडी नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे.
रुग्णालयात जाण्यासाठी गाडीत बसताना ललितने प्रथम, ‘मी पत्रकारांशी बोलीन’, असे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांच्या गाडीने वेग पकडल्याने त्याला फार बोलता आले नाही. यानंतर ललित पाटीलला रुग्णालयात आणल्यानंतर त्याने पुन्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच बोलायला सुरुवात केली. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे.
दरम्यान यावेळी यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन, असे ललित पाटीलने म्हटले. यामुळे आता तो काय खुलासा करणार हे लवकरच समजेल. यामुळे मात्र राजकारणात खळबळ उडाली आहे.