शहादा तालुक्यातील असलोद गावात महिलांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्री बंदी आणि बियर बार-शॉपीचे परवाने रद्द करण्यासाठी अनोखी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. “आडवी बाटली” म्हणजे दारूबंदी आणि “उभी बाटली” म्हणजे दारू सुरू ठेवण्याच्या बाजूने मतदान घेण्यात आले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर “आडवी बाटली” निवडून दारूबंदीच्या बाजूने स्पष्ट मत दिले.
असलोद गाव आणि परिसरात अवैध दारू विक्री व अधिकृत बियर बार-शॉपीमुळे महिलांना अनेक समस्या भेडसावत होत्या. २०१२ पासूनच गावकऱ्यांनी दारूबंदीची मागणी लावून धरली होती. परंतु संबंधित परवाने मिळवण्यासाठी खोटे दस्तावेज सादर करून काही जणांनी बेकायदेशीररित्या व्यवसाय सुरू ठेवला होता.
जिल्हा प्रशासनाने महिलांसाठी मतदान प्रक्रिया राबवून हा निर्णय घेण्याचा ठराव केला. मतदानासाठी तीन बूथ स्थापन करण्यात आले. एकूण १२०० महिलांपैकी ६७७ महिलांनी मतदान केले. त्यात “आडवी बाटली”ला तब्बल ६१२ मते मिळाली, तर “उभी बाटली”ला फक्त ४८ मते मिळाली. १७ मते बाद ठरली.
दारूबंदीचा विजय आणि आनंदोत्सव
“आडवी बाटली”ने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या निर्णयामुळे गावात दारू विक्री आणि बियर बार-शॉपी बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसीलदार दीपक गिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.
खोट्या दस्तावेजांवर प्रश्नचिन्ह
गावकऱ्यांनी मागणी केली असली तरी काही अधिकाऱ्यांकडून खोटे दस्तावेज सादर करून परवाने मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परवाने देणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.