Pune University : पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तुलनेत इथं उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं, त्यामुळे राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात घडणाऱ्या एका प्रकाराने खळबळ उडवली आहे. वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींकडून मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याचा आरोप समोर आला असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
विद्यार्थिनीनेच केला प्रकार उघड
या संदर्भात वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हा प्रकार उघडकीस आणला आहे. तिने मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असलेल्या विद्यार्थिनींचे फोटो आणि व्हिडिओ घेतले आणि हा संपूर्ण प्रकार वसतीगृहाच्या महिला अधिकाऱ्यांकडे मांडला. मात्र, वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर, संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरूंना पत्र लिहून याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रशासनाची दुर्लक्ष, विद्यार्थिनीचा आरोप
या विद्यार्थिनीने प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. विद्यापीठ प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेत असे प्रकार घडत असतील आणि प्रशासन गप्प बसत असेल, तर हा विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ठरू शकतो.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इशारा
या संपूर्ण प्रकरणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) देखील आक्रमक झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आणि परिसर नशामुक्त करण्यासाठी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ABVP ने दिला आहे. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.