आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात असं असणार चित्र, थक्क करणारी आकडेवारी आली समोर…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये आता महाराष्ट्रासहीत देशभरात घेतलेल्या ओपिनिअन पोलमध्ये यंदाची निवडणूक भाजपासाठी अच्छे दिन घेऊन येणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या आघाड्या, युतीसंदर्भातील बऱ्याच चर्चा आणि निर्णय गुलदस्त्यात असतानाही एनडीएला लोकसभा 2024 मध्ये तब्बल 366 जागा मिळताना दिसत आहेत.

तसेच यामध्ये इंडिया आघाडीला 106 जागा मिळतील. यामध्ये इतर पक्षांना 73 जागांपर्यंतच मजल मारता येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का देणारी आकडेवारी समोर येत आहे. या ओपिनिअन पोलनुसार सध्या राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांना 48 जागांपैकी 39 जागांवर विजय मिळताना दिसत आहे.

तसेच महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळेल. अजून युती तसेच आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित झालेले नाही. याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 19 ते 21 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. तर महाविकास आघाडी 26 ते 28 जागांपर्यंत मजल मारेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. सध्या मात्र परिस्थिती बदलली आहे.

ज्या राज्यांमध्ये भाजपाला फटका बसण्याची शक्यता होती तिथं पक्षासाठी साकारात्मक वातावरण दिसत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थानिक पक्षांचा आणि ‘इंडिया आघाडी’ आघाडीचा जोर कायम असेल. तामिळनाडूमधील 39 पैकी 36 जागा ‘इंडिया आघाडी’ला मिळतील.

यामध्ये आम आदमी पार्टी देखील काही जागा जिंकेल, तसेच इतर प्रादेशिक पक्ष देखील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होत आहेत. ते किती जागा जिंकणार यावर देखील बरच गणित अवलंबून आहे.