पवारांना धक्का! कालपर्यंत गाडीतून सोबत फिरणारा आमदार आज अजितदादा गटात, मंत्रिपदंही मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे.

सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामध्ये एक अजित पवारांचा गट आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेले काही नेते आता अजित पवारांसोबत जाताना दिसत आहे. आता शरद पवारांना आणखी एक धक्का बसला आहे.

शरद पवार यांच्यासोबत असलेले त्यांच्या गाडीतून प्रवास करणारे आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मकरंद पाटील यांनी अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या रविवारी अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या मंत्रिपदाच्या यादीत मकरंद पाटील यांचे नाव होते. पण शरद पवारांशीही चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला नव्हता.

मकरंद पाटील यांनी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपण निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि आपण अजित पवारांसोबत जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच अजित पवारांनी यावेळी मकरंद पाटील यांना मंत्रिपद देणार असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे टेंशन वाढले आहे. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळांसारखे दिग्गज नेते अजित पवारांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीच्या पक्षावरच दावा ठोकला आहे.