Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. असे असताना त्यांनी काल उपोषण मागे घेतले. त्यांनी आरक्षणासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील एक पाऊल मागे येण्यास तयार झाले कसे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयाला कारण ठरला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेला एक खास माणूस.
सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले विशेष कार्य अधिकारी असलेल्या मंगेश चिवटे यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यांनी ती यशस्वी पार देखील पाडली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
दरम्यान, शासकीय यंत्रणेला सूचना करणे, आदी बाबींमुळे मंगेश चिवटे हे आधीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते. यामुळे त्यांच्यात संवाद होता. आंदोलकांना मदत, वैद्यकीय सेवेमुळे मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची विश्वास संपादन केला होता.
आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंगेश चिवटे हे तातडीने जालन्यातील अंतरवाली सराटी या उपोषणस्थळी दाखल झाले. नागपूरवरून रात्रभर प्रवास करत ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मंगेश चिवटे हे उपोषणस्थळी दाखल झाले.
यावेळी चिवटे यांच्या मोबाइलवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. यामुळे जरांगे यांनी देखील याला काहीवेळ लागणार असल्याचे लक्षात आले. यामुळे ही कोंडी फुटण्याची चिन्हे दिसू लागली.
यानंतर चिवटे हे मुंबईत गेले, मुख्यमंत्र्यांना जरांगे यांचे म्हणणे सांगितले. यानंतर अनेक मंत्री आणि चिवटे पुन्हा एकदा जालन्यात येत हे आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे यामध्ये चिवटे यांची भूमिका ही खूप महत्त्वाची राहिली आहे.