महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहे. ते नाशिक दौऱ्यावर असताना सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर त्यांना अडवण्यात आले होते. त्यानंतर तो टोलनाका मनसैनिकांनी फोडला आहे.
मनसैनिकांनी टोलनाका फोडल्यामुळे राज्याचं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक वादही होताना दिसत आहे. भाजपने एक व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे.
आता भाजपच्या त्या गंभीर आरोपांना मनसेकडून उत्तर देण्यात आले आहे. सिन्नरमधील टोलनाका फोडला त्याला काही कारणं होती. टोलनाक्यावर काम करणाऱ्यांनी अमित ठाकरेंचा अपमान केला होता. त्यामुळे तो टोलनाका फोडण्यात आल्याचे मनसैनिकांनी सांगितले आहे.
त्यानंतर मनसेच्या या कृतीला भाजपने दादागिरी चालणार नाही. त्यांची गाडी फक्त २-३ मिनिटं थांबली होती, असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा मनसेने त्यांना उत्तर दिले आहे. मनसेने ट्विटरवर एक पोस्ट करत भाजपला सुनावले आहे.
जर सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल नसते, तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती. त्यामुळे निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते, असे विधान अमित ठाकरेंनी केले होते. हा फोटो शेअर करत मनसेने एक ट्विट केले आहे.
मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय. आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? असे ट्विटमध्ये मनसेने म्हटले आहे.
तसेच मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत, असे म्हणत मनसेने भाजपला चांगलंच सुनावलं आहे.