Mohammed Shami : विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आता भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातून अंतिम फेरीसाठीचा दुसरा संघ निश्चित होईल.
काल रात्री भारताने न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला विजय खरोखरच विलक्षण होता. पण, या सामन्यात भारताच्या विजयात खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसोबतच निसर्गाचाही महत्त्वाचा वाटा होता.
हे आम्ही म्हणत नसून, शेवटच्या सामन्यात भारताकडून विरोधी संघाचा धुव्वा उडवणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे हे शब्द आहेत. मोहम्मद शमीने या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या.
त्याने न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पिंजून काढला. भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज विरोधी संघाविरुद्ध निष्प्रभ ठरत असताना त्यानी हे केले. मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हा शमीने या विजयाचे रहस्य सांगितले.
शमी म्हणाला की, ” मी वर्ल्ड कपपूर्वी वनडे क्रिकेट फार कमी खेळलो होतो. मी माझ्या संधीची वाट पाहत होतो. न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला येथे माझे पुनरागमन सुरू झाले. आपण नेहमीच गोलंदाजीच्या वैविध्याबाबत बोलत असतो, परंतु तरीही माझा विश्वास आहे की नवीन चेंडूने विकेट मिळवणे हे महत्वाचे असते.
मी विल्यमसनचा झेल सोडला. त्यावेळी मी घाबरलो होतो. मला फार वाईट वाटत होते. पण मी घाबरलो असले तरी मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले. खेळपट्टी ही फलंदाजासाठी चांगली होती. कारण दुपारी चांगल्या धावा निघत होत्या.
संध्याकाळी दव पडल्यामुळे फलंदाजीसाठी पोषक वातावरण होते. या परिस्थितीत विकेट्स मिळवण्याची एक वेगळी कला असते. खेळाडूंना फटके मारण्यासाठी पुढे आणून विकेट्स मिळवायची असते, हीच गोष्ट मी या सामन्यात केली.
त्यामुळे मला यश मिळाले. गेल्या दोन्ही सेमी फायनलमध्ये आम्ही पराभूत झालो होते. त्यामुळे यावेळी सर्व काही सर्वस्व पणाला आम्ही लावले होते. जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे संघाने शेवटपर्यंत हा सामना सोडला नाही आणि त्यामुळेच आम्ही फायनलमध्ये पोहोचू शकलो.” शमी या विजयाचा खरा नायक ठरला.
कारण खेळपट्टी ही फलंदाजीसाठी कुरण होती. त्यांना मोठे फटके सहज मारता येऊ शकत होते. पण या खेळपट्टीवर शमीने जी गोलंदाजी केली त्याला तोड नव्हती. भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी आता शमीच्या नावावर नोंदवली गेली आहे.