मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली, पण भाजपकडून एक अट, राज ठाकरेंकडून विषय कट, नेमकं काय घडलं?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तसेच मनसेवर कोणी जास्त टीका देखील केली नाही. यामुळे ही युती होणार असल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, भाजपने मनसेला एक प्रस्ताव दिला होता. यामध्ये तुम्ही महायुतीत या, लोकसभा निवडणूक महायुतीत येऊन लढा. एक ते दोन जागा तुमच्यासाठी सोडतो, असा प्रस्ताव राज ठाकरेंना देण्यात आला. मात्र एक अट म्हणजे मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील, असेही सांगितले.

मात्र हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळून लावला. माझे उमेदवार माझ्याच पक्षाच्या चिन्हावर लढतील असं राज यांनी भाजपला सांगितले. यामुळे याबाबत चर्चा फेटाळली असल्याचे सांगितले जात आहे. नंतर भाजपने राज यांना आणखी एक प्रस्ताव दिला.

तुम्ही आता महायुतीत या. विधानसभेला तुमचा योग्य तो सन्मान करू. तुमची ताकद लक्षात घेऊन जागा देण्यात येतील. लोकसभेला होणाऱ्या मदतीच्या बदल्यात राज्यसभेची जागा देण्यात येतील, असा प्रस्ताव भाजपने मनसेला दिला आहे. यावर अजून कोणताही निर्णय झाला नाही.

दरम्यान, मुंबईत उद्धव ठाकरेंचा हल्ला परतवण्यासाठी भाजपला राज यांचा उपयोग होऊ शकतो. राज यांच्या पक्षाला मतदान करणारा वर्ग भाजपकडे वळल्यास उद्धव यांना मुंबईत शह देणे शक्य होणार आहे. यामुळे भाजप नेते यासाठी प्रयत्न करत आहेत.