Mumbai Indians : रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला फारसा आवडलेला नाही. त्यामुळे संतापलेले फॅन्स नवा कर्णधार हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल करत आहेत. त्याच्यावर यथेच्च टीका केली जात आहे.
एवढंच नव्हे तर मुंबईचे सोशल मीडिया फॉलोअर्स देखील झपाट्यानं कमी होत आहेत. मात्र हे ट्रोलिंग थांबवण्यासाठी MI च्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे टॉक्सिक फॅन्सला ट्रोलिंग थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जर त्यांनी हार्दिंक पांड्याला ट्रोल करायचं थांबवलं नाही तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा थेट ईशारा देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
“आम्ही फॅन्सच्या प्रतिक्रियांचा आदर करतो. पण काही फॅन्स हार्दिक पांड्याला खूप जास्त ट्रोल करत आहेत. त्याच्या कुटुंबीयांवर टीका करत आहेत. अश्लिल भाषेत टीका-टिप्पणी करत आहेत. अशा सर्व टॉक्सिक फॅन्सला आम्ही ब्लॉक करत आहोत.
अन् जर त्यांनी अशा प्रकारे ट्रोल करणं थांबवलं नाही तर कदाचित आम्हाला कायदेशीर मार्गानं जावं लागेल.” अशा आशयाचा इशारा या व्हिडीओद्वारे MI ट्रोलर्सला देण्यात आला आहे. हा व्हिडीओ ९ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर देखील कठोर शब्दात टीका केली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रोहित शर्माचे फॅन्स आणखी भडकलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या तरुणाला देखील ट्रोल केलं जात आहे. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यामुळे मुंबई फॅन्स प्रचंड नाराज आहेत.
अन् या व्हिडीओमुळे कदाचित MI चं फॅन फॉलोइंग आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान रोहित शर्मानं अद्याप या सपूर्ण प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तो हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदाबाबत काय बोलेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.