Nagpur news: काम देतो म्हणून फसवलं, नंतर महिलेवर 36 दिवस बलात्कार, घटनेने नागपुरात खळबळ..

Nagpur news: नागपूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, यशोधरानगरातील दोन महिलांनी एका २६ वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिची गुजरातमध्ये विक्री केली होती.

तसेच या महिलेच्या दोन्ही मुली हिसकावून घेण्यात आल्या. त्या महिलेवर ३६ दिवस तीन भावंडांनी दिवसरात्र सामूहिक बलात्कार केला. यामुळे हे किती धक्कादायक कृत्य आहे याचा अंदाज येतो. नंतर महिलेची मानवी अनैतिक तस्करी विरोधी विभागाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी सुटका केली.

याबाबत पोलीस तपास करत असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित ही पती व दोन चिमुकल्या मुलीसह यशोधरानगरात राहते. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ती काम शोधात होती. पती कामासाठी मुंबईत राहत होता. दीप्ती मिळेल ते काम करून दोन्ही मुलींचा सांभा‌ळ करत होती.

दरम्यान, काम शोधत असताना आरोपी नंदा पौनीकर आणि मंगला वरकडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला किराणा माल घेऊन दिला. नंदा आणि मंगला यांनी महिलेला गुजरातमधील जामनगर शहरातमध्ये एका श्रीमंत कुटुंबातील लहान बाळाला सांभाळायचे काम असल्याचे सांगितले.

आम्ही तुला काम देतो असे म्हटल्यावर 20 हजार पगार देखील ठरला. तिने कामाला होकार दिला. नंदा आणि मंगला यांनी २५ जुलै रोजी दीप्तीला दोन्ही मुलींसह नागपूर रेल्वे स्थानकावर नेले.

दरम्यान, त्यांच्यासोबत दोन अन्य मुली होत्या. दीप्तीला गुजरातमध्ये पोहचल्यावर संतोष नावाच्या युवकाच्या घरी नेले. त्या ठिकाणी मात्र धक्कादायक घटना समोर आली. दीप्तीच्या दोन्ही मुलींना हिसकावून घेत तिला धमकी दिली.

दरम्यान, त्या रात्री संतोष आणि त्याचे भाऊ गोलू आणि प्रतीक यांनी सामूहिक बलात्कार केला. सलग ३६ दिवस तिघांनी आळीपाळीने दीप्तीवर बलात्कार केला. रोजच्या या घटनेमुळे ती वैतागली होती. नंतर ती पळून आली. यानंतर तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली.