Nanded News : ८ दिवसांवर लेकीचे लग्न, पत्रिका घेऊन देवाला निघालेल्या बापावर काळाचा घाला, घडलं भयंकर

Nanded News : मुलीच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन देव दर्शनासाठी गेलेल्या पित्यावर काळाने घाला घातला आहे. कंटेनरच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मन हेलावून टाकणारी ही घटना शनिवारी दुपारी जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मानवाडी पाटीजवळ घडली.

लेकीचं आठ दिवसानंतर लग्न. घरात आनंदाचा क्षण होता. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पित्याचे लेकीचे कन्यादान करण्याचे स्वप्न होते. मात्र याचवेळी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानोबा माधवराव नरवाडे (५२) आणि आनंदीदास गणपत पांडे अशी मृतांची नावे आहेत.

मयत आनंदीदास पांडे हे बाभळी येथील रहिवासी आहे. त्यांच्या मुलीचा येत्या १७ डिसेंबर रोजी विवाह ठरला आहे. त्यांनी लग्नाची तयारी सुरु होती. पांडे हे लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी फिरत होते. मात्र यादरम्यान ही घटना घडल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

ते लग्नाची पत्रिका घेऊन आपले मित्र ज्ञानोबा नरवाडे यांच्या सोबत देव दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन परत दुचाकीने येत होते. यावेळी नांदेड – नागपूर महामार्गावरील मानवाडी पाटीजवळ पाठीमागून वेगाने येणाऱ्या कंटेनरच्या चालकाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये त्यांचे निधन झाले.

घटनेनंतर हदगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ पवार हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करुन गुन्हा दाखल केला. दरम्यान घटनेनंतर हदगाव शहरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, लेकीचे कन्यादान करण्यापूर्वीच पित्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे कुटूंबावर तसेच नातेवाईकांवर मोठे दुःख कोसळले होते. याबाबत पोलीस तपास करत आहेत.