नार्वेकरांची उमेदवारी फिक्स अन् मनसे नेत्यांची ती भेट, रात्रीत सगळा गेम फिरला, नेमकं काय घडलं?

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आहे.

सध्या महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडली आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६ जागांसाठी आग्रही आहे. यामुळे हा पेच कायम आहे. याबाबत दिल्ली दौरे देखील वाढले आहेत.

दरम्यान, जागावाटप रखडलेल्या १० पैकी ६ जागांवर शिवसेना, भाजपचा दावा आहे. तर ३ जागांवर भाजप, राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. तर एका जागेवर भाजप-सेनेसोबतच मनसेचीही चर्चा आहे. यामुळे मनसेला सोबत घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे युतीत आल्यास त्यांच्याकडून दक्षिण मुंबईचा आग्रह आहे. या मतदारसंघातून शिवडीचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांना तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी देखील माहिती समोर आली आहे. यामुळे या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याची मुंबईत भेट घेतली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र या भेटीनंतर समीकरण बदलले असल्याचे सांगितले जात आहे.

नार्वेकर देखील मतदारसंघात कामाला लागले असताना मनसेमुळे नवा ट्विस्ट आला आहे. दरम्यान, पक्षात अभूतपूर्व फूट पडूनही मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद कायम आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूतीही आहे. यामुळे भाजप सावध भूमिका घेत आहेत.

त्यामुळे मुंबईत ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी भाजपला राज यांची साथ महत्त्वाची आहे. ठाकरेंना उत्तर देण्यासाठी ठाकरेच मैदानात आल्यास भाजपसाठी लढाई सोपी होईल. मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. राज युतीत आल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. यामुळे भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.