Nilesh rane : नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी आज तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ट्विट करून त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामध्ये ते म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.
BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं.
काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील.
पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश राणे हे अनेकांवर जोरदार टीका करत होते. त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे.