Nilesh Rane : फडणवीसांनी भेट घेतली अन् सगळी गेमच फिरली; बड्या भाजप नेत्याने फिरवला निर्णय

Nilesh rane : काल नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ट्विट करून त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

यामध्ये ते म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.

दरम्यान, नीलेश राणे यांच्या या घोषणेनंतर भाजपच्या गोटात वेगवान हालचाली झाल्या. २४ तासांत नीलेश राणे यांची मनधरणी करण्यात पक्षाने यश मिळवले आहे. त्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण राणे कुटुंबीयांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर पोहोचले होते.

याठिकाणी बराच वेळ चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर ते गेले. याठिकाणी बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर नीलेश राणे यांनी आपला राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेत भाजपच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याची तयारी दर्शविली. 

दरम्यान, काल पोस्ट करत निलेश राणे म्हणाले होते की, BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं.

काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील.

पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.