राज्याचे राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी जसे बंड केले होते, तसेच बंड आता अजित पवारांनी केले आहे. त्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहे.
असे असतानाच खुपते तिथे गुप्ते या मराठी कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे. या कार्यक्रमात मराठी गायक अवधुत गुप्तेसोबत नितीन गडकरींनी मनसोक्त गप्पा मारल्या आहे. तसेच काही राजकीय मुद्यांवर भाष्यही केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरही त्यांनी उत्तर दिले आहे. अवधुत गुप्ते यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो दाखवले आणि त्यांच्या कोणत्या गोष्टी खुपतात असे नितीन गडकरी यांना विचारले.
गडकरींना पहिला फोटो हा उद्धव ठाकरे यांचा दाखवण्यात आला होता. त्यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खुपणारी गोष्ट ही आहे की ते फार कमी वेळा फोन उचलतात.
त्यानंतर नितीन गडकरी यांना शरद पवारांचा फोटो दाखवण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवारांबद्दल खुपणारी गोष्ट ही आहे की ते कधीच स्पष्ट बोलत नाही. नितीन गडकरी यांची दोन्ही उत्तरं ही चांगलीच चर्चेत आहे.
तसेच नितीन गडकरी हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. असे असतानाही ते दिल्लीला का गेले? असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, मला दिल्लीला जायचे नव्हते. पण परिस्थिती अशी झाली की मला दिल्लीला जावे लागले. त्यानंतर मला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले. पण दिल्लीत गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात जायचं नाही, असं मी ठरवलं.
तसेच महाराष्ट्रातील राजकारण हे देशाच्या राजकारणापेक्षा वेगळं आहे. मी १८ वर्षे विधीमंडळात होतो. मतभेद असायचे, टीकाही करायचो, पण व्यक्तिगत मैत्री असायची. पण आता थोडं जास्त झालंय. सामान्य माणूस राजकारणाला कंटाळला आहे. याला नेत्यांपेक्षा मीडियाच जास्त जबाबदार आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.