Naturals Ice Cream : बाप गावात हातगाडीवर आंबे विकायचा, मुलाने डोकं लावलं आणि बनवली 400 कोटींचा आईस्क्रीम कंपनी

Naturals Ice Cream : गरिबीत जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण गरिबीत मरायचं नाही हे आपल्या हातात आहे. स्वप्ने मोठी असतील तर कष्ट आणि संघर्षाने कोणतेही विजयाचे शिखर गाठता येते. अशीच एक यशोगाथा म्हणजे नॅचरल्स आईस्क्रीम(Naturals Ice Cream) कंपनीची.

ही कंपनी कर्नाटकातील एका गावातील फळ विक्रेत्याच्या मुलाने सुरू केली होती. आज ती 400 कोटींहून अधिक किमतीची कंपनी आहे. ही कथा रघुनंदन श्रीनिवास कामत यांची आहे. कामत यांचे वडील कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील एका गावात आंबे विकायचे.

कामत यांनी त्यांच्या वडिलांना योग्य फळ निवडताना पाहिले आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. योग्य फळे कशी निवडावी आणि त्यांचे जतन कसे करावे हे शिकण्यासाठी कामत यांनी त्यांच्या वडिलांसोबत अनेक वर्षे काम केले.

पण कामत यांची मोठी स्वप्ने होती. त्यांना काहीतरी मोठं करायचं होतं. कामत व्यवसाय करण्याच्या विचारात मुंबईत आले. कामत यांनी 14 फेब्रुवारी 1984 रोजी त्यांचा पहिला आइस्क्रीम ब्रँड Naturals लाँच केला.

त्यांनी मुंबईतील जुहू येथे पहिले स्टोअर उघडले. त्यावेळी नॅचरल्सकडे केवळ 4 कर्मचारी होते. त्यांच्याकडे 10 फ्लेवर्सचे आइस्क्रीम होते. सुरुवातीला कामत यांना भीती वाटत होती की, लोकांना हे आइस्क्रीमचे स्वाद आवडतील की नाही हे माहीत नाही.

म्हणून त्यांनी मुख्य उत्पादन म्हणून पावभाजी ठेवली आणि अॅड-ऑन उत्पादन म्हणून आइस्क्रीम विकायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी 12 फ्लेवर्ससह पूर्ण वाढलेले आईस्क्रीम पार्लर म्हणून स्टोअर सुरू केले.

रघुनंदनच्या या ब्रँडची एक खास गोष्ट होती. नॅचरल्स आइस्क्रीममध्ये कोणतेही केमिकल किंवा रंग टाकलेले नाही. ही खासियत त्यांनी 40 वर्षे जपली. त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ झाली. आता नॅचरल्सचा देशातील टॉप 10 ब्रँडमध्ये समावेश झाला आहे.

त्यांनी जुहू येथे 200 स्क्वेअर फूटमध्ये पहिले स्टोअर उघडले. सुरुवातीच्या वर्षात त्यांना 5 लाखांची उलाढाल झाली. आर्थिक वर्ष 2020 मध्ये नॅचरल्स आईस्क्रीमची उलाढाल 300 कोटी रुपयांवर पोहोचली होती. 2022 मध्ये ते 400 कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

चव वाढवण्याची युक्ती त्यांनी आईकडून शिकल्याचे कामत सांगतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्या ब्रँडचा यूएसपी फळ, साखर, दूध आणि आई आहे.

कामत यांनी नॅचरल्सची मार्केटिंग टॅगलाइनही ‘टेस्ट द ओरिजनल’ अशी ठेवली आहे. आता नॅचरल्स पार्लरमध्ये फक्त आइस्क्रीमच नाही तर हलवा आणि लाडू यांसारख्या मिठाईही उपलब्ध आहेत. ते त्यांची सर्व उत्पादने नैसर्गिक घटकांपासून बनवतात.