पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
आता अल्पवयीन मुलांचे गुन्हे रोखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांखालील मुलगा गुन्हेगारीमध्ये आढळला तर मुलासोबतच त्याच्या पालकांवरही कारवाई होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या या नव्या संकल्पनेमुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन टोळ्यांमध्ये वाद झाला होता. त्यामध्ये एका तरुणावर वार करण्यात आले होते. नंतर त्याच टोळीतील एकाने चहाच्या टपरीवर येऊन वाद घातला होता.
त्या परिसरातमध्ये काही दुचाकी उभ्या होत्या. त्यांची तोडफोड त्याने केली होती. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.
त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपास केला असता त्याच्या घरी दोन तलवारी, तीन कोयते आणि एक चॉपर असे साहित्य सापडले होते.
याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. विनापरवानगी अशी हत्यारे घरात बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या वडिलांवर ही कारवाई केली आहे. पाल्याला आवरा नाहीतर, तुमच्यावर पण कारवाई करु असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.