मुंबई : पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार नवोदित अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून, प्रमुख दलाल श्याम सुंदर अरोरा (वय 60) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली
पवई परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, त्यांनी तोतया ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला आणि कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता, तेथे चार नवोदित अभिनेत्री आणि मॉडेल्स वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचे उघड झाले. या तरुणींचे वय 26 ते 35 वर्षे असून, त्यांना देवनार येथील महिला सुधारगृहात हलवण्यात आले आहे.
दलालाकडून आर्थिक शोषण
पोलिस तपासात असे समोर आले आहे की, अरोरा ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेपैकी 50 टक्के हिस्सा स्वतःकडे ठेवत होता. तसेच, हॉटेलच्या खोल्यांमधून पोलिसांनी 8 महागडे मोबाईल आणि मोठी रोख रक्कम जप्त केली आहे.
हॉटेल आणि मसाज पार्लरच्या आड वेश्याव्यवसाय
राज्यात अनेक ठिकाणी हॉटेल आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी यावर करडी नजर ठेवली असून, अशा अवैध कृत्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही बेकायदेशीर गोष्ट आढळल्यास त्वरित तक्रार दाखल करावी.