राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहे. या दोन्ही गटांची बैठक आज पार पडणार असून त्यामध्ये कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अजित पवारांनी आपल्यासोबत असणाऱ्या आमदारांचा आकडा सांगितला नव्हता. त्यामुळे आमदारांबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच बैठकीपूर्वी दोन्ही गटातील आमदारांची आकडेवारी समोर आली आहे.
अजित पवारांसोबत सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजित पवारांना ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ४४ आमदार आहे. त्यापैकी ४२ आमदार हे विधानसभेचे आहे, तर २ आमदार हे विधानपरिषदेचे आहे. या ४४ आमदारांनी अजित पवारांना प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
तसेच शरद पवारांकडे आता किती आमदार आहेत याचा आकडाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे. शरद पवारांकडे आता फक्त ११ आमदार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. पण आता कोणाकडे नक्की किती आमदार आहे हे तर बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.