पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे खुप खास मित्र असल्याचे म्हटले जाते. त्यांचे जुने फोटो व्हायरल करुन विरोधक नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना दिसून येत असतात. आता त्यांची मैत्री ही १९६८ पासूनची असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये वाद सुरु आहे. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया देत मोठे खुलासे केले आहे. सध्याचं सरकार खनिज माफियांसमोर झुकलं आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये वाद होत आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महाग असलेला धातू प्लॅटिनियम सापडला आहे. ज्या ठिकाणी कुकी वास्तव्यास आहे. त्याठिकाणी ही प्लॅटिनियमची खाण सापडली आहे. सरकारने हे खाण उत्खननाचे अधिकार नरेंद्र मोदींचे खास मित्र असलेल्या गौतम अदानींना दिले आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी हे १९६८ पासूनचे लंगोटी यार आहे. दोघांवर त्याच साली एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा निकालही अजून लागलेला नाही. ते खुप खास मित्र असल्यामुळेच मोदींनी खनिज उत्खननाचे अधिकार अदानींना दिले आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
त्या भागात खनिज उत्खनन करायचे की नाही याबाबतचा अधिकार तेथील विधानसभेला नाही. तर तिथे असणाऱ्या आदिवासी हिल काऊन्सिलला आहे. त्यामुळे यावर काऊन्सिल म्हणाले होते की, भारत सरकार उत्खनन करणार असेल तर परवानगी देतो, पण खाजगी कंपनी उत्खनन करणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
तसेच आदिवासी हिल काउन्सिलमध्ये कुकी समाजातील लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांनी ती परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यामुळे सरकारने आसाम मणिपूरच्या सीमेवर राहणाऱ्या मैतेई नावाच्या हिंदू समाजाला आदिवासी जमातीचा दर्जा दिला. त्यामुळे या वादाला सुरुवात झाली, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.