पंतप्रधान मोदींवर निवडणूक लढवण्यावर ६ वर्षे बंदी? हायकोर्टातून महत्वाची माहिती आली पुढे…

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या उमेदवार देखील जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे आता प्रचार सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. देशभरात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागते. मते मिळविण्यासाठी नियम मोडता येत नाहीत. देशाचा पंतप्रधानालाही हे नियम लागू आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक आरोप झाला असून थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पिलीभीत मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मत मागितल्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असून, असे केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

आनंद एस. जोंधळे यांनी सदर याचिका दाखल केली आहे. यासाठी त्यांनी ९ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी पिलीभीत याठिकाणी दिलेल्या भाषणाचा हवाला दिला आहे. जोंधळे यांनी आपल्या याचिकेत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू धार्मिक स्थळाच्या नावावर तसेच शीख देवता आणि शिखांच्या धार्मिक स्थळाच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केला.

यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही निवडणूक लढण्यापासून सहा वर्षांची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागले आहे.