अजित पवार यांनी बंड करत शिवसेना-भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सामील होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाही ठोकला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच निवडणूक आयोगाकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवार हे पक्षाध्यक्ष असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शरद पवारांच्या हातातून पक्ष गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असे असतानाच आता एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. सी व्होटर या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा अध्यक्ष कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला लोकांनी जे उत्तर दिले आहे, त्यावरुन लोकांसाठी अजूनही शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे खरे अध्यक्ष कोण शरद पवार की अजित पवार? असा प्रश्न संस्थेकडून विचारण्यात आला होता. त्यामध्ये ६६ टक्के लोकांनी शरद पवार यांचे नाव घेतले आहे. तर फक्त २५ टक्के लोकांनीच अजित पवारांच्या नावाला मंजूरी दिली आहे. तर ९ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असे म्हटले आहे.
सध्याची स्थिती पाहता अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा जास्त संख्याबळ आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसारखे जेष्ठ नेते अजित पवारांसोबत गेले आहे. या दिग्गज नेत्यांच्या साथीने अजित पवार पक्षावर दावा करत आहे. पण जनतेच्या मनात अजूनही शरद पवारच असल्याचे स्पष्ट होत आहे.
अनेक आमदार गेले असताना शरद पवार आता पुन्हा मैदानात उतरले आहे. त्यावरही प्रश्न विचारण्यात आला होता. शरद पवार हे पुन्हा पक्ष आधीसारखा उभा करु शकतील का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ५७ टक्के लोकांनी होकार दिला आहे. तर ३७ टक्के लोकांनी याला नकार दिला. तर ६ टक्के लोकांनी मात्र आपल्याला याबद्दल सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे.