पुणे अपघात प्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलं, धंगेकरांनी केली पोलखोल, त्या व्यक्ती कोण?

अलिशान गाडी बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मद्यपी मुलाने दोन तरुणांना चिरडले. पुण्यातील या घटनेने सध्या या प्रकरणाची देशात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपवले गेल्याचा आरोप केला जात आहे.

पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरल आहे. त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी केली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे.

आपण याबाबत आक्रमक झालो नसतो तर हे प्रकरण दाबले गेले होते. आता या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्यापासून करायला हवी, या प्रकरणात पैशांचा वापर झाला आहे. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न देखील यावेळी करण्यात आला आहे.

दरम्यान, कुठल्याही अपघातात त्या कारमधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते. मात्र या प्रकरणात इतर २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे. FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही.

यासाठी त्या मुलांच्या पालकांकडून वेगळी डिल झाली आहे. असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर असताना पहिली F.I.R दाखल करताना अनेक अशा चुका करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो.

आरोपी स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली तरी देखील कलम १८५ लपवण्यात आले. तसाच प्रकार ३०४ कलममध्ये सुद्धा केला. हे कलम जर अगोदर लावले असते तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती, असेही धंगेकर यांनी सांगितले.