Pune Crime: पुण्यात चाललंय काय? चक्क १७ वर्षीय मित्रानेच केली रूममेटची हत्या, घटनेने पुणे हादरले..

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच रूमवर राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदनात मृतदेहावर मारहाण आणि गळा चिरल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेहाच्या खिशातून सापडलेल्या मोबाईलवरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुव याला केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

मृत तरुणाचे नाव नसीम सइदुल्लाह खान (वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे आहे, तर आरोपी तरुणाचे नाव कमल रोहित ध्रुव (वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे, मुळ रा. छत्तीसगड) असे आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत नसीम आणि आरोपी कमल हे दोघेही कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंगचे काम करतात. ते एकाच रूमवर राहतात.

नसीम वयाने कमलपेक्षा मोठा असल्याने तो कमलला सतत त्रास देत होता. घरातील सर्व कामे कमलला करायला लावायचा. दारू पिऊन मारहाणही करायचा. सोमवारी रात्रीही नसीम याने कमलला दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली आणि घराच्या बाहेर निघून गेला.

त्यानंतर आरोपी कमल हा देखील त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याला मारहाण करत गळा आवळून त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी कमलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.