Pune Fraud : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी सीकिंग एडवेंचर या डेटिंग साईटवर अनोळखी मुलीशी चॅटिंग करणे एका 36 वर्षीय व्यक्तीला महागात पडले आहे. यामुळे तरुणाची फसवणूक झाली आहे. या तरुणीने तरुणाला ९० हजार गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी संबंधित तरुणी आणि एका तरुणास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. फिर्यादी आणि तरुणीची एका डेटिंग साईटवर ओळख झाली.
ही ओळख पुढे वाढत गेली. याचे रूपांतर प्रेमात झाले. या तरुणीने आपले फोटो टेलिग्रामवर पाठवत तरुणाला भेटायचे असल्याचे सांगितले. तरुणीच्या या जाळ्यात फसलेल्या तरुणानेही भेटण्यासाठी होकार दिला. त्यांनी एका हॉटेलमध्ये रुम बूक केली.
असे असताना तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तरुणाने देखील आधी 12 आणि नंतर 38 हजार पाठवले. तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाने लगेच पैसेही पाठवले. मात्र त्यानंतर तरुणीची मागणी वाढत गेली. यामुळे फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिला.
यावर आरोपी तरुणीने हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या एका व्यक्तीला आतमध्ये बोलावले. त्या व्यक्तीने आत आल्यानंतर फिर्यादीला मारहाण करत जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. यामुळे तरुण खूपच घाबरला.
फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी नितीश सिंग आणि पूजा भट या दोघांना अटक केली आहे. सध्या अशा प्रकारे पुण्यात अनेक घटना घडत आहेत.