Pune News : पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका स्थापन करण्याची शक्यता वाढत आहे. यासाठी प्रशासनाच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगरपरिषदा तसेच लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील काही गावांचा समावेश करून ही नवीन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावानुसार, आळंदी नगरपरिषदेत चऱ्होली, मरकळ, सोळु, केडगाव आणि वडगाव घेणंद या गावांचा समावेश करण्यात येईल. चाकण नगरपरिषदेत निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, महाळुंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वराळे, आंबेठाण, शिंदे, सावरदरी, भांबोली, वासुली, बिरदवडी आणि वाकी या गावांचा समावेश करण्यात येईल.
राजगुरुनगर नगरपरिषदेत राक्षेवाडी, चांडोली, शिरोली, सातकरस्थळ, भांबुरवाडी आणि तिन्हेवाडी या गावांचा समावेश करण्यात येईल. या प्रस्तावासाठी विभागीय आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तीनही नगरपरिषद आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांना अहवाल मागवला आहे.
या अहवालात संबंधित गावांचा क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि हद्दीचा सविस्तर आढावा देण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे मानले जात आहे.
मात्र, यामुळे काही गावांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांची राजकीय सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रस्तावाला स्थानिक स्तरावर विरोध होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात सध्या दोन महापालिका आहेत.
पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका. आता तिसरी महापालिका स्थापन झाल्यास पुणे जिल्ह्यात एकूण तीन महापालिका असतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याची घोषणा होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.