काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं. नेते भूमिका बदलतात, पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.
याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये अलविदा मनसे! महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.
राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं. पाच वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता.
त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.
आज साहेबांनी आपली भूमिका बदलली. राजसाहेब ठाकरे यांनी ‘भामोशा’ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही.
त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता मनसेमध्ये यावरून एकमत नसल्याचे दिसून येत आहे.