आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये 2019 आणि 2022 मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आणि त्यावेळची संधी फडणवीसांना मिळाली नाही, असे सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या नेतृत्वाला ज्या पद्धतीने विश्वास दिला, तो विश्वास फडणवीस राज्याच्या विकासासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी वापरतील, अशी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षांत सरकारच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमांना माझा आणि मनसेचा पाठिंबा असेल. मात्र, सरकारने चूक केली तर ती दाखवून देण्याचे कामही आम्ही करू.”
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने मनसेच्या राजकीय धोरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीचे सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा अंदाज वर्तवला होता. निवडणुकीत मनसेला एकही जागा न मिळाल्याने पक्षाचे भविष्यातील राजकीय धोरण काय असेल, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह नव्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.