‘उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन हटवा’, शिवसेनेच्या बैठकीत धक्कादायक ठराव मंजूर

शिवसेनेच्या बैठकीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीतून उद्धव ठाकरे यांना हटवण्याचा ठराव करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सध्या या समितीचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितले.

मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. बैठकीत संघटनात्मक बदल तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबतही चर्चा झाली. रामदास कदम यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून फारकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

रामदास कदम यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर काळीमा फासल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली असून, लवकरच नवीन नियुक्त्या करण्यात येतील.

शिवसेनेच्या आगामी कार्यपद्धतीसाठी नवीन समित्या गठित करून नियुक्त्या केल्या जातील, असेही रामदास कदम यांनी सांगितले. 23 तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये आयोजित मेळाव्यात शिवसेनेचे आमदार आणि खासदारांचा सत्कार होणार असून, यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य नेत्यांची निवड होईल.

उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे, आणि इतर नेत्यांबाबत केलेल्या टीकेवरही रामदास कदम यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना-भाजप युती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.