Road Accident : पोलिसांच्या गाडीला ट्रकने ठोकलं, दोन इन्सपेक्टर अकडलेले, मदत येईपर्यंत सगळं काही संपलं

Road Accident : दिल्लीमधून अपघाताची एक भीषण माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात दोन पोलिस निरीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांतील दोन निरीक्षकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, हे दोन्ही निरीक्षक पोलिस वाहनातून जात असताना कॅंटरने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे यामध्ये गाडीचा अक्षरशः भुगा झाला होता. सोनीपतच्या कुंडली सीमेजवळ रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही निरीक्षक कारमध्येच अडकून पडले होते.

दरम्यान, अपघातस्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. नंतर यंत्रणा उभी राहिली. तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी निरीक्षकांना रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अनेकवेळ ते गाडीतच अडकून पडले होते.

मृत्यू झालेल्या दोन्ही निरीक्षकांची ओळख पटली आहे. निरीक्षक दिनेश बेनिवाल आणि निरीक्षक रणवीर अशी या दोघांची नावे आहेत. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. यावेळी रोडवर जास्त वाहने नव्हती.

दरम्यान, निरीक्षक दिनेश बेनिवाल हे उत्तर पश्चिम जिल्ह्यात स्पेशल स्टाफमध्ये तैनात होते. तर निरीक्षक रणवीर हे आदर्श नगर पोलिस ठाण्यात एटीओ म्हणून तैनात होते. या अपघातामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत अपघाताची माहिती घेऊन चौकशी देखील केली जात आहे. या अपघातात कोणाची चूक असेल तर कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.