..म्हणून अजित पवारांचे ९५ टक्के आमदार पुन्हा आमच्याकडे येतील; पवारांनी गणितंच सांगितलं

अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अनेक आमदार अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त असून त्यांचे संख्याबळ अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांच्या या बंडामुळे राज्याचे राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हैराण करणारे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले ९५ टक्के आमदार हे परत येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करणारे ९५ टक्के आमदार परत येतील. अजित पवारांकडे जास्त आमदार आहे याची चर्चा सातत्याने होत आहे. पण पुढच्या १० ते १५ दिवसांमध्ये काय होते पहा असे म्हणत रोहित पवारांनी आमदार परतण्याचा सुचक इशारा दिला आहे.

अजित पवार यांच्यासोबत नक्की किती आमदार गेले? यावर सातत्याने चर्चा होत असते. पण पुढच्या १० ते १५ दिवसांत सगळ्या गोष्टी बदलतील, असे म्हणत रोहित पवार यांनी त्याचे गणित सुद्धा स्पष्ट करुन सांगितले आहे.

मला एक कळत नाही, ३६ चा आकडा आपल्याला कशाला पाहिजे. कारण पक्षावर दावा करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागत नाही. तर गटाच्या मेजॉरिटीसाठी म्हणजे दोन तृतीयांश बहुमतासाठी ३६ आमदारांची गरज असते. दोन तृतीयांश आमदारांची गरज दुसऱ्या पक्षात विलिणीकरण होण्यासाठी लागत असते. म्हणजे त्या आमदारांची इच्छा भाजपमध्ये विलीन व्हायची आहे का? असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

त्या गटाला भाजपमध्ये विलीन व्हायचे आहे की नाही? हे नंतर कळेल. पण ही भूमिका आमदारांच्या लक्षात आली तर ९० ते ९५ टक्के आमदार परत आल्याचे तुम्हाला दिसून येईल, असेही रोहित पवारांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.