मोठी बातमी! सकल मराठा समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा, महायुतीच्या जागा धोक्यात

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सकल मराठा समाजाने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. नाशिक आणि दिंडोरीत या दोन ठिकाणी सकल मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे.

नाशिकच्या जागेवर २० मे रोजी मतदान होत आहे. नाशिकच्या जागेवरुन मोठी रस्सीखेच झाली. त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा संधी दिली. मात्र शेवटपर्यंत ही जागा कोणाकडे जाणार आणि उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उमेदवारी उशीर जाहीर झाल्यामुळे गोडसे यांना प्रचारासाठी अतिशय कमी वेळ मिळाला आहे. यातच सकल मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिंदेंचे टेन्शन वाढले आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या राजाभाऊ वाजे. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे याठिकाणी आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी अजून कोणती भूमिका जाहीर केली नाही.

दरम्यान, नाशिकमध्ये मराठा मतदारांचे प्रमाण तब्बल ७० टक्के आहे. महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे दोघेही मराठा समाजातून येतात. यामुळे याचा फटका त्यांना बसू शकतो. यामुळे महायुतीचे टेंशन वाढले आहे. सकल मराठा समाजानं घेतलेल्या भूमिकेचा थेट फायदा वाजेंना होऊ शकतो.

दिंडोरीतही अशीच परिस्थिती आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या दिंडोरीमध्ये मराठा मतदार ३५ ते ४० टक्के इतकं आहे. दिंडोरीत कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं राहतो. त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार प्रयत्नशील आहेत.