Sanjay Khan: काळीज तोडणारी बातमी! टीव्ही मालिकेच्या सेटवर भीषण आगीत होरपळून ५२ जणांचा मृत्यू

Sanjay Khan: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय खान यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरलेल्या ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर १९८९ मध्ये भीषण आग लागली होती. या अग्निकांडात ५२ जणांचा मृत्यू झाला होता. संजय खान हेही या अग्निकांडात गंभीर जखमी झाले होते. ते ६५ टक्के भाजले होते.

‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ हा टीव्ही शो भगवान गिडवानी यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होता. संजय खान यांनी हा शो दिग्दर्शित केला होता. त्याशिवाय ते या शोमधील प्रमुख कलाकार होते. त्यांनी टीपू सुल्तानची भूमिका साकारली होती.

१९८९ मध्ये हा शो सुरू होण्यापूर्वी, मैसूरच्या प्रीमियम स्टूडिओमध्ये शूटिंग सुरू होतं. ८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण टीम सेटवर शूटसाठी पोहोचली आणि प्रत्येकाने आपापल्या कामाला सुरुवात केली. त्यावेळी अचानक सेटवरील एका भागात आग लागली. आगीच्या घटनेनंतर सेटवर एकच खळबळ माजली होती. लोक सैरावैरा पळू लागले होते. आगीनंतर काही करण्याआधीच अनेक लोक आगीच्या विळख्यात येत मृत्यूमुखी पडले.

संजय खान यांनी या अग्निकांडाबद्दल त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. माझ्या टीममधील ५२ जणांचा मृत्यू झाला. मीही ६५ टक्के भाजलो होतो. मी लोकांना वाचवण्यासाठी धावलो, पण आग आणि धुराच्या आघातामुळे मला श्वास घेता येत नव्हता. शेवटी मला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आणि मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

संजय खान यांच्यावर तब्बल ७२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना जवळपास १३ महिने रुग्णालयात राहावे लागले. या अग्निकांडानंतर संजय खान पूर्णपणे बरे झाले आणि त्यांनी ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’चा शो पूर्ण केला. ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’चा पहिला शो एपिसोड शूट करण्यासाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च झाले होते.

हा शो प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याने संजय खान यांना एक यशस्वी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. हा अग्निकांड भारतीय टीव्ही इतिहासातील सर्वात भीषण अग्निकांडांपैकी एक मानला जातो. या घटनेने संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून सोडले होते.