Sanjay Raut : शिवसेना-भाजप युती तुटू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते, असा दावा शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. सकाळी साडेसात वाजता झालेल्या या पत्रकार परिषदेत राऊतांनी फडणवीसांच्या भूमिकेवर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर बोलताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असल्यासच भाजप हिंदुत्वाचा प्रचार प्रभावीपणे करू शकतो, असे भाजप नेत्यांचे मत होते. यामुळेच त्यांनी शिवसेनेशी युती केली.” राऊत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा एकत्र उचलला होता आणि त्यावरच त्यांनी देशभर निवडणुका लढवण्याचे ठरवले होते. “बाबरी प्रकरण आणि अयोध्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभर लढाई करू इच्छित होतो. यामुळे शिवसेनेचे नाव देशभर लोकप्रिय झाले होते,” असे ते म्हणाले.
राऊत यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर देखील भाष्य केले. “आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये ६०-६५ जागांवर लढाई करण्याचा विचार केला होता. आमच्या तयारीनुसार आम्हाला ४० जागा मिळवण्याची खात्री होती, पण यावर भाजपचे धाबे दणाणले,” असं ते म्हणाले.
राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयींचा उल्लेख करत सांगितले की, “बाळासाहेबांना अटलजीचा फोन आला आणि त्यात त्यांनी सांगितले की, देशभर निवडणुका लढल्यास भाजपला नुकसान होईल, त्यामुळे आम्ही आपले उमेदवार मागे घेतले.” बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या हितासाठी त्याग केला, अशी माहिती राऊत यांनी दिली.
“२०१४ मध्ये प्रत्येक जागेवर ७२ तास चर्चा झाली. मी त्या चर्चांमध्ये होतो. ओम माथुर प्रभारी होते, आणि आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो, की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये, यासाठी आग्रही होते,” असे राऊत यांनी सांगितले.







