संतोष देशमुखांच्या भावाने विष्णू चाटेला केले सलग 35 कॉल, 36 व्या कॉलला थेट डेड बॉडीच पाठवली

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत असून, आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे.

सुरेश धस यांच्या मते, संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात तब्बल 36 वेळा फोनवर संवाद झाला. विष्णू चाटेने प्रत्येक वेळी “आत्ता भाऊंना पाठवतो” असे सांगितले, मात्र शेवटच्या कॉलमध्ये संतोष देशमुख यांचा मृतदेहच पाठवण्यात आला, असे सुरेश धस यांनी सांगितले.

या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे, पण प्रमुख आरोपी अद्याप मोकाट असल्याची भावना लोकांमध्ये आहे. हत्या आणि खंडणीसह अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडवर 15, सुदर्शन घुलेवर 19, आणि इतर आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.