बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी त्वरित तपास आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करत बसांची तोडफोड केली. मात्र, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत केले, त्यानंतर काल रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.
संतोष देशमुख कोण होते?
संतोष देशमुख हे मस्साजोग गावाचे सरपंच होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात उपसरपंचकीने झाली, तर त्यांच्या पत्नीने प्रथम सरपंच म्हणून काम केले. पुढे सरपंचपदाची धुरा त्यांनी स्वतः सांभाळली. गावाच्या विकासात आणि राजकारणात त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.
हत्या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांची कारवाई
या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रतीक घुले याला पुण्याहून, तर जयराम चाटे आणि महेश केदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, आणि कृष्णा आंधळे फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके नेमली आहेत.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, आरोपींना न्यायालयीन कारवाईसाठी लवकरच हजर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तपासासाठी विशेष प्रयत्न
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू ठेवला आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली असून, याच गाडीतून त्यांना ठार मारण्यात आले, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांची मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्येने मस्साजोग गाव आणि संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ग्रामस्थांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.