गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्हही मिळवले होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती तर काही लोकांनी त्यांना समर्थन दिले होते. पण आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत जनता नक्की कोणाला साथ देणार हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
२०२४ च्या आगामी विधानसभा निवडणूकीबाबत सकाळ समुहाने एक सर्वे केला आहे. त्यामध्ये मतदारांना तुम्ही कोणाला पाठिंबा देणार एकनाथ शिंदेंना की उद्धव ठाकरेंना? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच काही राजकीय प्रश्नही विचारण्यात आले होते.
७३ हजार मतदारांनी या सर्वेतून माहिती दिली आहे. पण यातून मिळणारा निकाल हा खुप हैराण करणारा असल्याचे समोर आले आहे. पुढील निवडणूकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड करणार? असा प्रश्नही मतदारांना विचारण्यात आला होता.
त्यावेळी असे समोर आले आहे की, २६.८ टक्के लोकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर १९.१ टक्के लोकांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. १४.९ टक्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, ५.७ टक्के अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, १२.७ टक्के उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तर ४.९ टक्के लोकांनी हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर २.८ टक्के लोकांनी मनसे आणि २.८ लोकांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे.
या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरताना दिसून येत आहे. मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना मतदान करतील असे या सर्वेतून समोर आले आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना १९.४ टक्के लोकांनी, तर एकनाथ शिंदेंना ८.५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.