अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे.
राज्यात सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार पक्षबांधनीला निघाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदार संघात त्यांची पहिली सभा होणार आहे.
अशात सभेच्या आधी शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. बंड केल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांनी शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर आरोप केले होते. आता या आरोपांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिले आहे. ज्या नेत्याने कधीही भाजपसोबत चला अशी मागणी केली नाही, त्याने पक्षाचं नुकसान केलं की जो नेता भाजपसोबत गेलाय त्याने पक्षाचं नुकसान केलंय? असा सवाल पवारांनी केला आहे.
तसेच छगन भुजबळांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबईत त्यांचा पराभव झाला होता. पण ते निवडून यावे यासाठी येवला हा आमच्या विचारांच्या मतदार संघांत त्यांना संधी दिली होती. पण आता जे बाजूला गेलेत त्यांच्याबद्दल आम्ही ठरवणार नाही.
प्रफुल्ल पटेल यांनी देखील सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होती की, पवारांनी पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंच्या हातात दिली होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा कित्येक वर्षे सत्तेत होता तरी मी सुप्रियाला मंत्री केलं नाही. उलट प्रफुल्ल पटेलांना मी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिलं. तर लोकसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत संधी दिली होती.