शिखर धवनने आधीच केला होता चहल आणि धनश्रीच्या नात्याचा पर्दाफाश, ‘ती’ परिस्थिती पाहून केला थेट सवाल

भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्रने 2020 मध्ये धनश्री वर्मासोबत विवाह केला होता. कोरोना काळात डान्स क्लासच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि ती प्रेमात बदलली.

मात्र, आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे बोलले जात आहे, परंतु दोघांनीही यावर भाष्य करणे टाळले आहे.

सध्या युजवेंद्र आणि धनश्री एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत नाहीत. इतकेच नाही, तर युजवेंद्रने धनश्रीचे फोटोही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकले आहेत. दोघांना काही दिवसांपासून एकत्र पाहिले गेलेले नाही.

पूर्वी धनश्री युजवेंद्रच्या जवळपास सर्वच सामन्यांना उपस्थित राहून त्याला पाठिंबा द्यायची, परंतु आता ही स्थिती बदलली आहे. अचानक काय घडले की, हे दोघे घटस्फोटाचा विचार करत आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडतो आहे.

काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये युजवेंद्र आणि धनश्री यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले होते. या व्हिडिओत युजवेंद्र अनेक बॅग घेऊन जाताना दिसतो, त्यामध्ये धनश्रीच्या बॅग्सही आहेत.

यावर धनश्री म्हणते की, तिचा पाय दुखत असल्याने युजवेंद्रने तिच्या बॅग्स घेतल्या आहेत. शिखर धवनने हा व्हिडिओ मजेने तयार केला होता, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.